शिवसेनेकडून राणे पिता पुत्रांची लाल तोंडाच्या माकडांशी तुलना


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरल्यावर अयोध्येला जाणार असल्याचे बोलले जात होते. यादरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यावरून टीकास्त्र सोडले होते. शिवसेना उपनेते, नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका यशवंत जाधव यांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राणे पिता पुत्रांवर सडकून टीका केली आहे.

लाल तोंडाची माकडे कोणत्याही घाटात दिसतात. त्यातील तीन चुकून राजकारणात आली. या फांदीवरून त्या फांदीवर ती उड्या मारत असतात. आता सगळ्या फांद्या संपल्या पण यांच्या उड्या काही संपत नाहीत. पुढची उडी कुठे मारतात ते त्या ‘नारायणास’च ठाऊक, असे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे.

नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर पंढरपूरला जाऊन लांबून दर्शन घेणारे आणि हार ही हातात न घेणारे मुख्यमंत्री अयोध्याला जाऊन प्रभू रामाचे दर्शन किती लांबुन घेणार?, त्यासोबतच बेबी पेंग्विन अयोध्याला जात असेल तर A.C ची सोय करून ठेवा! पेग्विंनला थंड हवा लागते. नाहीतर लगेच गाडीत पळुन बसतो!, अशा शब्दात टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, यशवंत जाधव यांनी केलेल्या या टीकेवर राणे काय बोलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.