दक्षिण कोरियातील संशोधकांचे संशोधन; घरातच कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका


नवी दिल्ली – ओढावलेल्या कोरोना संकटामुळे संपूर्ण जग एकाप्रकारे थांबले आहे. त्याचबरोबर जगभरातील बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रत्येकामध्ये त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून आले आहेत. त्याचबरोबर काहींची प्रकृती गंभीर झाली, काहींमध्ये सौम्य लक्षणे दिसली तर काहींना हा आजार होऊन गेल्याचे कळले देखील नाही.

आतापर्यंत जगभरात लाखो लोकांचे बळी या व्हायरसमुळे गेले आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी आपण विशेष काळजी घेतो. यामध्ये तोंडाला मास्क बांधणे, सोशल डिस्टन्सिंगसारखे उपाय आहेत. पण आपण घराबाहेर पडताना जेवढी काळजी घेतो, त्यापेक्षा किंबहुना जास्त काळजी घरी असताना घेण्याची देखील आवश्यकता आहे.

त्यातच आता दक्षिण कोरियातील साथरोगशास्त्रज्ञांनी घराबाहेर कमी पण घरातल्याच सदस्यांकडून कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याचा निष्कर्ष काढला आहे. ही साथ दक्षिण कोरियात सुरु झाल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह ठरलेले ५,७०६ रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेले ५९ हजार जण यांचा अभ्यास करुन हा स्टडी रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. १६ जूलैला हा रिपोर्ट सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हएशनमध्ये प्रकाशित झाला आहे, तर यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या स्टडी रिपोर्टनुसार कोरोनाची लागण झालेल्या १०० रुग्णांपैकी फक्त दोघांना घराबाहेरील व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे कोरोना झाला होता.

दक्षिण कोरियात वयोगटाचा विचार केल्यास घरातच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त होते. कोरोनाची लागण किशोरवयीन युवक-युवती आणि ६० ते ७० वयोगटातील नागरिकांना प्रामुख्याने झाली. कुटुंबियांच्या जास्त संपर्कात हे दोन्ही वयोगट असावेत. त्यामुळे या वयोगटांना जास्त सुरक्षेची आवश्यकता असल्याचे कोरियन सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हएशनचे संचालक जीआँग यांनी सांगितले.

कोरोनाची लागण नऊ वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना होण्याचे प्रमाण अत्यअल्प असल्याचे डॉ. यंग जून म्हणाले. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होऊनही लक्षणे आढळली नसल्यामुळे त्या वयोगटात इंडेक्स रुग्ण शोधून काढणे कठिण गेले. कोरोना व्हायरसच्या प्रसारामध्ये वेगवेगळया वयोगटांमुळे फार असा मोठा फरक पडत नाही. या व्हायरसचा प्रसार होण्याचे लहान मुलांकडून प्रमाण फार कमी असू शकते. पण आमच्याकडे उपलब्ध डाटा कमी असल्यामुळे तसा दावा करता येणार नसल्याचे डॉ. यंग जून म्हणाले. हा अभ्यास २० जानेवारी ते २७ मार्च दरम्यान गोळा केलेल्या माहितीवरुन करण्यात आला. दक्षिण कोरियात या काळात कोरोना व्हायरसचा मोठया प्रमाणावर प्रसार झाला होता.