शिक्कामोर्तब ! 5 ऑगस्टला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने अयोद्धेतील राम मंदिराचा प्रश्न निकाली काढल्यानंतर या मंदिराच्या निर्माण कार्याला आता वेग आला आहे. आता अयोद्धेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 5 ऑगस्टला शिलान्यास आणि भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान देशातील सार्‍या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या सोहळ्याला आमंत्रण असेल अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली आहे. या कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, त्याचबरोबर या कार्यक्रमाला 200 पेक्षा अधिक लोक नसतील अशी माहिती गिरी यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोद्धेमध्ये 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपुजनापूर्वी हनुमान गढीचे, त्यानंतर राम लल्लांचे दर्शन घेणार आहेत.

दरम्यान राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून महाराष्ट्रात अनेक चर्चा रंगत आहेत. एकीकडे शरद पवार यांनी कोरोना संकटकाळातही काही राम मंदीर महत्त्वाचे वाटते असे म्हणत भाजपला टोला लगावला होता. तर एकेकाळी राम मंदिरासाठी आग्रही असलेली शिवसेना आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि काँग्रेस या धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या पक्षांसोबत सत्तेत असताना राम मंदिरासाठी अयोद्धेला जाणार का? भाजपकडून उद्धव ठाकरेंना आमंत्रण येणार का? असे प्रश्न विचारले जात होते. दरम्यान यावर अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.