जाणून घ्या ऑक्सफर्ड-सिरमच्या कोविशील्ड (Covishield) लसीबाबत सर्वकाही


संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाच्या दुष्ट संकटाविरोधात लढा सुरु असून या दुष्ट संकटापासून सुटका मिळावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक अहोरात्र मेहनत करत आहेत. त्याचबरोबर या रोगाचा समूळ नाश करण्यासाठी लस बनवण्याचा प्रयत्न जगभरामध्ये सुरु आहे. जगभरातील वेगवेगळ्या संस्थांकडून सुरु असणारे हे प्रयत्न वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोहचले आहेत. पण या सर्वांमध्ये ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी आणि भारतीय औषध निर्मिती संस्था सिरम इन्स्टिट्युट द्वारा तयार होत असलेली लस सर्वात आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शेवटच्या टप्प्यामध्येही ही लस यशस्वी ठरली तर जगातील सर्वात मोठ्या लस निर्मिती कंपनीकडून तिचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

यात भारतीयांची मान जगभरात उंचावले अशी दिलासादायक बातमी अशी की या लसीचे उत्पादन घेणारी कंपनी म्हणजेच सिरम इन्स्टिट्युट ही कंपनी भारतीय आहे. इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या लसीसंदर्भातील अनेक महत्वाच्या गोष्टींचा ऑक्सफर्ड व्हॅकसीन ग्रुपचे निर्देशक अ‍ॅण्ड्रू जे पोलार्ड आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष आदर पूनावाला यांनी खुलासा केला. त्यांनी या मुलाखती दरम्यान अगदी उत्पादनापासून ते किंमत आणि लसीला काय नाव देणार यासारख्या गोष्टींबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे.

कोविशील्ड (Covishield) असे नाव ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटी आणि औषध उद्योगातील एस्ट्राजेनेका कंपनीच्या संयुक्त प्रयत्नामधून तयार करण्यात येणाऱ्या या कोरोना लसीला देण्यात येणार असून या लसीचे सकारात्मक परिणाम मानवी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या दिसून आले तर ही लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले जातील. जगभरामध्ये ही लस पोहचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिचे उत्पादन घेतले जाईल.

याबाबत माहिती देताना पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष आदर पूनावाला यांनी सांगितलेल्या नुसार या लसीचे सिरम इन्स्टिट्युटकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाईल. कोविशील्डचे ३० ते ४० कोटी डोस या वर्षी डिसेंबरपर्यंत तयार करण्यात येतील, असेही पूनावाला म्हणाले.

भारतीय औषध नियामक म्हणजेच डीसीजीआयकडे (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) याच आठवड्यामध्ये कंपनी परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती पूनावाला यांनी दिली. कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या ५० टक्के लसी या भारतासाठी ठेवण्यात येणार असून उरलेल्या ५० टक्के लसी जगभरातील देशांमध्ये पाठवण्यात येतील, असेही पूनावाला म्हणाले.

पूनावाला यांना ही लस किती रुपयांना उपलब्ध असेल यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सध्या संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असल्याने लसीची किंमत कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न असेल असे म्हटले आहे. कंपनीचा या लस विक्रीच्या माध्यमातून नफा कमवण्याचा कोणताही विचार नसल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारतामध्ये ही लस एक हजार रुपयांच्या आसपास उपलब्ध होईल.

कोरोना हा पोलिओ, मलेरियासारख्या आजारांपेक्षा खूप मोठा आणि जास्त आव्हानात्मक असा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोना लसीकरण केले जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये भारतीयांना मोफत किंवा अगदी कमी किंमतीमध्ये कोरोना लस दिली जाण्याची शक्यता आहे. पूनावाला यांनाही बहुतांश लसी या सरकारकडून खरेदी केल्या जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या लसी लोकांना लसीकरण मोहिमेअंतर्गत मोफत दिल्या जातील असेही पूनावाला यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर पूनावाला यांनी संपूर्ण जगाला कोरोना लसीची गरज असल्याचे म्हटले आहे. कोरोनाची लस बाजारामध्ये लवकरात लवकर उपलब्ध होण्याची सरकार आणि संस्था वाट बघत आहेत. पण सरकारी यंत्रणांचे सहकार्य लाभले तरच मोठ्या प्रमाणात उत्पादन घेता येणार असल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले. सरकारकडून आम्हाला निर्मिती आणि वितरण या दोन्ही कामांमध्ये मदतीची अपेक्षा असल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे.

कोविशील्डच्या आतापर्यंतच्या चाचण्यांवरुन ही लस कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये खूपच प्रभावशाली ठरेल असे चित्र दिसत आहे. ऑक्सफर्ड व्हॅकसीन ग्रुपचे निर्देशक अ‍ॅण्ड्रू जे पोलार्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅण्टीबॉडी प्रतिसादावरुन ही लस प्रभावशाली असल्याचे निदर्शनास आले आहे. चाचण्या यशस्वी ठरल्या असल्या तरी मोठ्या प्रमाणात ही लस वापरली जाईल तेव्हाच ती किती परिणामकारक आहे हे समजू शकेल असेही पोलार्ड यांनी म्हटले आहे.

बाजारात लस लवकर आणण्याच्या शर्यतीमध्ये लसीच्या दर्जा खालवणार नाही ना यासंदर्भात प्रश्न विचारला असता पोलार्ड यांनी लस बनवण्यासाठी पर्यायी सोप्पा मार्ग उपलब्धच नसल्याचे स्पष्ट केले. लस बनवताना तिचे क्लीनिकल ट्रायल म्हणजेच प्रयोगशाळेत चाचण्या घेतल्या जातात. त्यामुळे या लसीच्या दर्जाबद्दल शंका घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे पोलार्ड यांनी म्हटले आहे.