कोरोना : भारतीय वंशाच्या नर्सचा सिंगापूरमध्ये राष्ट्रपती पुरस्कारने सन्मान

सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या काळात कोरोना यौद्धा म्हणून सर्वात पुढे येऊन काम करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या नर्सचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. कला नारायणसामी यांचा 5 नर्सेसमध्ये समावेश आहे, ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्व नर्सेसना सिंगापूरचे राष्ट्रपती हलीम याकूब यांच्याद्वारे स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र, एक ट्रॉफी आणि 10 हजार सिंगापूर डॉलर्स देण्यात आले.

नारायणसामी या वुडलँड्स हेल्थ कँम्पसमध्ये नर्सिंगच्या उपसंचालक आहेत. कोरोना महामारीच्या संकटात संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. या उपाययोजना त्यांनी 2003 साली सार्सच्या वेळी शिकल्या होत्या.

नारायणसामी या सध्या 2022 मध्ये सुरू होणाऱ्या वुडलँड हेल्थ कॅम्पसच्या नियोजनात सहभागी आहेत. त्या पुरस्काराविषयी म्हणाल्या की, मी पुढील पिढीतील नर्सेसला तयार करेल. मी नेहमीच आमच्या नर्सेसना सांगते की, नर्सिंग तुम्हाला कधीच पुरस्कृत करण्यात अपयशी ठरणार नाही.

वर्ष 2000 साली नर्सेसना त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देण्याची सुरूवात झाली होती. आतापर्यंत 77 नर्सेसना सन्मानित करण्यात आले आहे.