विना क्लचची ह्युंडाई ‘वेन्यू आयएमटी’ भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

ह्युंडाई इंडियाने काही दिवसांपुर्वी घोषणा केली होती की आपली लोकप्रिय एसयूव्ही वेन्यूमध्ये एक नवीन इंटेलिजेंट मॅन्यूअल ट्रांसमिशन (आयएमटी) देण्यात येईल, ज्याच्याद्वारे क्लचचा वापर न करता गिअर टाकता येतील. आता कंपनीने हे तंत्रज्ञान असलेले मॉडेल 9.99 लाख रुपयांमध्ये लाँच केले आहे. ह्युंडाई वेन्यू आयएमटीला कंपनीने एसएक्स आणि एसएक्स (ओ) या दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आले असून, आयएमटी केवळ 1.0 लीटर पेट्रोल इंजिनसोबत देण्यात आले आहे. एसएक्स (ओ) व्हेरिएंटची किंमत 11.08 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.

आयएमटी तंत्र असणाऱ्या मॉडेलमध्ये क्लच नसेल, परंतु हे ऑटोमॅटिक पेक्षा वेगळे आहे. कारण यात चालकाला स्वतः गिअर बदलावे लागतील. याशिवाय ह्युंडाईने वेन्यूचे एक नवीन स्पोर्ट ट्रिम देखील बाजारात आणले असून, हे पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध असेल. या स्पोर्ट्स ट्रिमला एका खास टाइटन ग्रे आणि फँटम ब्लॅक रूफ रंगाच्या ड्यूअल टोनमध्ये सादर करण्यात आले आहे.

Image Credited -NDTV

याशिवाय स्पोर्ट ट्रिम फँटम ब्लॅक रुफसह पोलर व्हाइट ड्यूल टोनमध्ये देखील उपलब्ध आहे. कारच्या आत देखील अनेक नवीन गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. स्पोर्ट ट्रिमच्या वेगवेगल्या मॉडेलची किंमत 10.20 लाख रुपये ते 11.52 लाख रुपयांच्या मध्ये आहे.

Image Credited -Cartoq

ग्राहकांच्या मागणीमुळे कंपनीने कप्पा 1.2 पेट्रोल बीएस6 इंजिनसोबत एक नवीन, स्वस्त एस+ मॅन्युअल ट्रिम देखील लाँच केले आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये प्रोजेक्टर हेडलँम्पस, प्रोजेक्टर फॉग लँम्पस, एलईडी टेल लँम्प आणि 20.32 इंच सेमी टचस्क्रीन देखील मिळेल. यात अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्राईड ऑटो सपोर्ट मिळेल. या मॉडेलची किंमत 8.31 लाख रुपयांपासून (एक्स शोरूम) सुरू आहे.