६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द


नवी दिल्ली – जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर माध्यमांच्या माहितीनुसार ६४ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच या सोहळ्यात खंड पडल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भातील माहिती नोबेल पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेने दिली आहे. तसेच हा पुरस्कार सोहळा वेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नोबेल आठवडा ज्या प्रकारे आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या यावेळची परिस्थिती वेगळी आहे. हे वर्ष गेल्या वर्षीच्या तुलनेत निराळे आहे. सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज असल्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल, अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली. दरम्यान, नोबेल पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

नोबेल पुरस्कार सोहळ्याचे दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आयोजन करण्यात येते. यालाच नोबेल विक म्हणूनही ओळखले जाते. या कालावधीत दरवर्षी त्या वर्षातील नोबेल पुरस्कार विजेत्यांना स्टॉकहोममध्ये आमंत्रित केले जाते. स्टॉकहोमच्या सिटी हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात विजेत्यांसाठी स्वीडिश राजघराण्यातील आणि जवळपास १३०० पाहुण्यांसोबत भोजनाचेदेखील आयोजन केले जाते. ओस्लोमध्ये शांती पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले जाते. याठिकाणी येण्याचे त्यांनादेखील आमंत्रण दिले जाते.