धक्कादायक : कोरोनाग्रस्त महिलेचा पतीला भेटण्यासाठी थेट पुणे ते यूएई प्रवास

देशासह राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. सरकारने क्वारंटाईनचे नियम कठोर केले आहेत. असे असले तरी काहीजण या नियमांना न पाळता इतरांचे प्राण देखील धोक्यात टाकत आहेत. पुण्यातील हिंजवडी भागातील एक कोरोनाचा संसर्ग झालेली माहिला क्वारंटाईनचे नियम मोडत थेट यूएईला आपल्या पतीकडे गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आता पिंपरी-चिंचवड आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या 30 वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनुसार या महिलेचा पती यूएईमध्ये राहतो.

महिलेला 11 जुलैला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील आपल्या फ्लॅटमध्ये होम-क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र सर्व नियम मोडत महिला मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विशेष विमानाने यूएईला रवाना झाली. शारजाह आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महिलेने पुण्यातील सरकारी डॉक्टरला मेसेज केला की विमानतळावर कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, महिलेने नेगेटिव्ह रिपोर्टचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले. महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी प्रवीण साळवे यांनी सांगितले की, महिलेच्या विरोधात आयसोलेशन नियमांचे उल्लंघन केल्याने तक्रार करण्यात आली आहे.