चीनची मुजोरी, आता ठोकला भूतानच्या जमिनीवर दावा

चीन आपल्या विस्तारवादी भूमिका कायम ठेवताना दिसून येत आहे. भारतीय क्षेत्रावर दावा केल्यानंतर आता चीनने भूतानच्या भारताला लागून असलेल्या वाईल्ड लाईफ सेंच्यूरीवर दावा ठोकला आहे. याशिवाय भूतानसोबत अद्याप सीमा निश्चित करण्यात आलेल्या नसल्याचे देखील चीनने म्हटले आहे. चीनने सीमावादाच्या समाधानासाठी भूतानला एक प्रस्ताव देखील दिला आहे. परंतु, दुसरीकडे भूतानने हा दावा पुन्हा एकदा फेटाळला आहे.

चीनने जागतिक पर्यावरण सुविधा परिषदेच्या 58व्या बैठकीत भूतानच्या सकतेंग वन्यजीव अभयारण्याच्या जमिनीला विवादित ठरवले आहे. चीनच्या या दाव्याबाबत प्रश्न विचारले असता, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, दोन्ही देशांमधील सीमा अद्याप निश्चित होणे बाकी आहे.

वांग म्हणाले की, चीनने नेहमीच स्पष्ट केले आहे की भूतान आणि आमच्या सीमा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. मध्य, पुर्व आणि पश्चिम भागात वाद आहे. त्यामुळे या विवादावर चीन पॅकेज समाधान प्रस्तावाचे समर्थन करत आहे. दरम्यान, दुसरीकडे नवी दिल्लीतील भूतानच्या दूतावासाने सकतेंग मुद्यावर चीनच्या दुतावासाला आक्षेप दर्शवणारे पत्र पाठवले आहे.

भूतानने चीनच्या या दाव्यावर आक्षेप दर्शवत साकतेंग वन्यजीव अभयारण्य हे भूतानचा अभिन्न आणि सार्वभौम भाग असल्याचे म्हटले आहे. पहिल्यांदा जेव्हा या अभयारण्याला निधी देण्याची वेळ आली त्यावेळी चीनने संधी साधत या जमिनीवर आपला दावा ठोकला होता.