एक चतुर्थांश दिल्लीकरांना कोरोनाची लागण; तज्ज्ञ म्हणतात हे तर चांगले लक्षण


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच या रोगाची आपल्याला लागण होऊ नये यासाठी प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने काळजी घेत आहे. पण यात चिंताजनक बाब अशी देशाची राजधानी दिल्लीत दिल्लीत आतापर्यंत २३ टक्के लोकांना म्हणजे एक चतुर्थांश लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीतील एवढ्या लोकांना कोरोनाची लागण एका अर्थी चिंतेची बाबच आहे. पण दिल्लीतील तज्ज्ञांच्या मते हे तर चांगले लक्षण आहे. पण याबाबत हे तज्ज्ञ असे का म्हणत आहे आणि त्यामागे नेमके काय कारण आहे, ते आधी आपण जाणून घेतले पाहिजे.

दिल्लीतील २३ टक्के नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब एनसीडीसीने केलेल्या सिरो सर्वेमधून समोर आली आहे. प्रत्येकाच्या शरीरातील रक्ताचे नमुने घेऊन या सिरो सर्वेमध्ये तपासणी करण्यात आली. संसर्गाविरोधात लढण्यासाठी शरीरात किती प्रमाणात अँटीबॉडीजची निर्मिती झाली ते या चाचणीद्वारे तपासण्यात आले. एनसीडीसीने हा सिरो सर्वे दिल्ली सरकारसोबत मिळून केला. २७ जून ते १० जुलै दरम्यान एकूण २१,३८७ रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या सर्वेमधून २३ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दिल्लीची अंदाजित लोकसंख्या १.९ कोटी आहे. सर्वे रिपोर्टनुसार, २३ टक्के म्हणजे आतापर्यंत ४० लाखा पेक्षा जास्त लोकांना या व्हायरसची बाधा झाली आहे. लॅबमध्ये केलेल्या चाचणीतून दिल्लीत आतापर्यंत १.२३ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सिरो सर्वेच्या रिपोर्टमधला आकडा त्यापेक्षा जास्त आहे.

अनेकांच्या शरीरात अँटीबॉडीजची निर्मिती झाल्याचे सिरो सर्वेमध्ये दिसून आले म्हणजे त्यांना व्हायरसची बाधा होऊन गेली होती तसेच त्यांच्या शरीरात व्हायरस विरोधात लढण्यासाठी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली होती. दिल्लीमध्ये करण्यात आलेले हे सर्वेक्षण भारत हर्ड इम्युनिटीच्या दिशेने जात असल्याचे संकेत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.