तिरुपती शहर कंटेनमेंट झोन घोषित; 5 ऑगस्टपर्यंत शहर पूर्णतः लॉकडाउन


तिरुपती – देशातील सर्वात श्रीमंत अशी ओळख असलेल्या आंध्रप्रदेशातील तिरुपती देवस्थान शहरात 5 ऑगस्टपर्यंत पूर्णतः लॉकडाउन घोषित करण्यात आला असून हा निर्णय शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. पण, यादरम्यान तिरुपती बालाजीसह इतर सर्व मंदिर सुरू राहणार आहेत. शहरातील लॉकडाउनमुळे तिरुपती ट्रस्टने आपल्या ऑफलाइन सर्वदर्शन तिकीट व्यवस्था सध्या बंद केली आहे. आता मंदिरात दर्शनासाठी फक्त ऑनलाइन टाइम स्लॉट उपलब्ध असेल.

संपूर्ण तिरुपती शहर वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. तिरुपतीमधील सर्व 56 वार्डात 20 ते 30 कोरोना रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाने शहरांच्या सीमा बाहेरील वाहनांसाठी बंद केल्या असून, 5 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन असेल. यादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतील. यादरम्यान मंदिराच्या वाहनांना ये-जा करण्याची परवानगी असेल.

दरम्यान तिरुपती मंदिरातील 170 कर्मचारी संक्रमित झाले आहेत. माजी मुख्य पुजारी श्रीनिवास दीक्षितुलु यांच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर सोमवारी मंदिर ट्रस्टवर मंदिर बंद करण्याचा दबाव आहे. मंदिर बंद करण्याची मागणी कर्मचारी संघटना करत आहेत. पण ट्रस्टने अद्याप मंदिर बंद ठेवण्याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. फक्त 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचारी आणि पुजाऱ्यांना मंदिरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.