यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होत आहे सर्वाधिक वाढ


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोना महामारीचे संकट परतवून लावण्यासाठी लॉकडाऊन सारखा उपाय आजमावूनही देशातील कोरोना सारखा जीवघेणा रोग अद्याप नियंत्रणात आलेला नाही. त्यातच देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने लक्षणीय वाढ होत आहे. काल दिवसभरात देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात ३७,१४८ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५८७ जणांनी कोरोनामुळे आपले जीव गमावले आहेत.

पण कोरोनाबाधितांच्या आकड्यात होणाऱ्या वाढी मागे चाचण्या हे सुद्धा एक कारण आहे. देशभरात चाचण्यांचा वेग वाढवल्यामुळे कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यात समाधानकारक बाब अशी आहे की, देशात अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.

देशात आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार १९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ४ लाख दोन हजार ५२९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, तर सात लाख २४ हजार ५७८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे २८ हजार ८४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सोमवारी देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.