राज्यातील अमर, अकबर अँथनीचे सरकार आपोआपच पडेल; दानवेंचा टोला


नवी दिल्ली : टीव्ही 9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात सध्या अमर, अकबर अँथनीचे सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत करावी, केंद्र सरकार तर मदत करतच असल्याचेही दानवे म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राममंदिराच्या भुमिपूजनासाठी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी भुमिपूजनाला त्यांनी जावे. पहले मंदिर, फिर सरकार, असा पूर्वी शिवसेनेचा नारा होता, पण आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या भुमिपूजनाला जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना प्रमाणपत्र घ्यावे लागेल, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

दरम्यान सध्या महाराष्ट्रात राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी पहले मंदिर फिर सरकार अशी घोषणा दिली होती. निवडणुकीपूर्वी आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. पण आता उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची परवानगी घ्यावी लागत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.