दक्षिण चीन समुद्रात वाढला तणाव, चीनने सुरू केला युद्धाभ्यास

दक्षिण चीन समुद्र भागात मागील काही दिवसांपासून तणावाची स्थिती आहे. चीनी सैन्य पीपुल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) येथे युद्धाभ्यास करत आहे. एवढेच नाहीतर आता चीनने येथे युद्धविमान देखील तैनात केले आहे. अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात युद्धविमान पाठवल्यानंतर आता चीनकडून देखील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.

चीनच्या राष्ट्रीय रेडिओनुसार, पीएलएचे संपुर्ण ब्रिगेड दक्षिण चीनमध्ये हैनाना भागात समुद्र हल्ल्याची तयारी करत आहे. या दरम्यान लढाऊ जेएच7 बॉम्बरचा देखील सराव करण्यात आला. हा युद्धाभ्यास गुरूवारपर्यंत सुरू राहणार आहे. तर दुसरीकडे फॉर्ब्सने दावा केला आहे की, चीनी सैन्याने या भागात आपले जे-11बी फायटर जेट्स तैनात केले आहेत. अमेरिकी युद्धविमानांना चेतावणी देण्यासाठी चीनने असे केले आहे.

अमेरिकेने चीनचा दावा नाकारत दक्षिण चीन समुद्रात आपली उपस्थिती वाढवली आहे. अमेरिकेने मागील दोन आठवड्यात अनेक एअरक्राफ्टला ड्रिलसाठी या भागात पाठवले. याशिवाय अमेरिकेच्या युद्धनौकाला देखील या भागात पाहण्यात आले होते. याच कारणामुळे चीन भडकला आहे.

पंरतु, चीनने दावा केला आहे की त्यांचा हा युद्धाभ्यास काही नवीन नसून, अशाप्रकारचे ड्रिल सुरूच असतात. मे महिन्यापासूनच या भागात अँटी सबमरीन एअरक्राफ्ट, कंट्रोल सिस्टमला तैनात करण्यात आले आहे.