आता परदेशात अडकलेल्या 3 हजार विद्यार्थ्यांची देशवापसी करणार सोनू सूद

अभिनेता सोनू सूद कोरोना संकटाच्या काळात गरीब आणि स्थलांतरित कामगारांसाठी देवदूत बनून समोर आला आहे. या संकटात त्याने विविध राज्यात अडकलेल्या हजारो प्रवासी कामगारांना बस, रेल्वे आणि विमानाच्या मदतीने आपआपल्या घरी पाठविण्यासाठी मदत केली. त्याच्या या कार्याचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले. आता सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे.

सोनूने आता किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या बिहार-झारखंडच्या जवळपास 3000 विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणणार आहे. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासासाठी किर्गिस्तानला गेले होते.

मेडिकलचे हे सर्व विद्यार्थी कोव्हिड-19 मुळे परदेशात अडकले होते, असे सांगितले जात आहे. या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या विनंतीनंतर सोनू सूदने त्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला. सोनूने एअरलिफ्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सोनूने एक ट्विट करत माहिती दिली की, विद्यार्थ्यांना रेसक्यूसंबंधी काही माहिती हवी असल्यास मेल करावा. यासाठी कोणतेही चार्ज अथवा पैसे लागणार नाही. सोनूने ईमेल देखील शेअर केला आहे.