निलेश राणेंनी सोडली नाही कोरोनाबाधित आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्याची संधी


सिंधुदुर्ग: राज्यावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नाही आहे. त्यातच राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. आतापर्यंत या कोरोनाच्या विळख्यात कोरोना वॉरिअर्ससह राजकारण्यांपर्यंत अनेकजण अडकले आहेत. त्यातच मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार वैभव नाईक यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

वैभव नाईक यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शासकीय रुग्णालयात वैभव नाईक यांच्यावर उपचार सुरू असल्याचे कळते. पण सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

कुडाळ-मालवण मतदारसंघाचे वैभव नाईक हे आमदार आहेत. नाईक यांनी लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अनेक ठिकाणी दौरा केला होता. यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत वैभव नाईक हे दौऱ्यासोबत होते. आमदार नाईक यांच्या सहवासात जिल्ह्यातील अनेक लोक आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे बहुसंख्य अनेक पदाधिकारी आलेले आहेत.

दरम्यान, अशा परिस्थितीतही माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. रेड्याला कोरोना होऊ शकतो??? तपास करा कोरोना मेला असेल. मागच्या २ दिवसात हा रेडा अनेकांच्या संपर्कात आलाय त्यात डांबर चोर उदय सामंत पण आहे, असे म्हणत निलेश राणे यांनी नाईक आणि सामंत यांच्यावर टीका केली आहे.

Loading RSS Feed