राष्ट्रवादीच्या महिला खासदार कोरोनाच्या विळख्यात


परभणी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी येथील राज्यसभा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. फौजिया खान यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाजवळचा परिसर सील करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचीही तपासणी केली जाणार असल्याचे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान कोरोनाचा संसर्ग राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना झाला असून आता राष्ट्रवादीचे परभणी जिल्ह्याध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यापाठोपाठ येथील महिला खासदारही कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या 63 वर्षीय फौजिया खान या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यांची मार्च महिन्यामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे शालेय शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, राज्यमंत्रीपद होते. फौजिया खान याआधी दोन वेळा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यही होत्या.

दरम्यान खासदार फौजिया खान यांच्याविषयी परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर माहिती दिली, ते म्हणाले की, फौजिया खान यांचे परभणी येथील नांदखेडा रोड येथे निवासस्थान आहे. निवासस्थानी असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, खान यांच्या घरासह नजिकचा परिसरही सील करण्यात आला आहे.