धक्कादायक : प्लाझ्मा डोनर बनून 200 लोकांची फसवणूक करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

देशात एकीकडे लोक कोरोना व्हायरस महामारीचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे काही लोक याचा चुकीचा फायदा उचलत फसवणूक करत आहेत. कोरोनाच्या नावाखाली काही ठग लोकांना लुबाडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना हैदराबादमध्ये समोर आली असून, येथे कोरोनारुग्णांसाठी प्लाझ्मा दान करणे आणि औषधाची व्यवस्था करण्याचे वचन देऊन 200 पेक्षा अधिक लोकांना फसवण्यात आले आहे.

हैदराबाद पोलिसांनी एका 25 वर्षीय युवकाला अटक केले असून, या युवकाने अनेकांना प्लाझ्मा देण्याच्या नावाखाली फसवणूक केली. या युवकाने रुग्णांना वचन दिले होते की कोरोनापासून बरे होण्यासाठी औषधाची व्यवस्था करेल.

पोलिसांनुसार, युवकाने प्लाझ्माच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल केली. आरोपीने यासाठी हायटेक पद्धत वापरली. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणाला प्लाझ्माची गरज आहे, याचा शोध घेतला व त्यांना फोन करत प्लाझ्मा देण्यासाठी पैसे मागितले.

आरोपी ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे घेऊन रुग्णांशी संपर्क करणे बंद करत असे. कोरोनाचे औषध उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली देखील व्यक्तीने अनेकांची फसवणूक केली. एका व्यक्तीने स्वतःबरोबर अशी घटना घडल्यानंतर पोलिसात धाव घेतली. त्यावेळी सर्व प्रकार उघडकीस आला.