बेरोजगारांच्या हाताला काम देणाऱ्या कंपनीकडून 960 कर्मचाऱ्यांची कपात


नवी दिल्ली : बेरोजगारांच्या हाताला काम देणारी कंपनी अशी ओळख असलेल्या मायक्रोसॉफ्ट कॉर्प.ची प्रोफेशनल नेटवर्किंग साइट असणाऱ्या लिंक्डइनने आपल्या 960 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, जगभरातील त्यांच्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची कंपनीकडून कपात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जगभरात कोरोनाच्या संक्रमणामुळे रिक्रूटमेंट प्रोडक्ट्सची मागणी कमी झाल्यामुळे हा निर्णय कंपनीकडून घेण्यात येत आहे.

त्याचबरोबर कंपनीचे असे म्हणणे आहे की सेल्स आणि हायरिंग डिव्हिजनमधील कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे.
LinkedIn या प्लॅटफॉर्मचा वापर एखाद्या कंपनीस योग्य उमेदवाराची आणि एखाद्या व्यक्तीस त्याच्या क्षमतेनुसार नोकरी संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी केला जातो. याबाबतची माहिती कंपनीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे.

याबाबत लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान रॉसलान्सकी (Ryan Roslansky) यांनी अशी माहिती दिली आहे की, 10 आठवड्यांचा पगार कामावरून कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्याचप्रमाणे या वर्षाअखेर पर्यंत आरोग्य विम्याची सुविधा देखील अमेरिकेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कंपनीकडून भविष्यात नवीन नोकऱ्यांची संधी निर्माण झाल्यास, या कर्मचाऱ्यांचा प्राथमिक स्तरावर विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

रॉसलान्सकी यांनी पुढे अशी माहिती दिली की, केवळ एवढीच नोकरकपात आम्ही करत आहोत. अद्याप या कर्मचाऱ्यांना काही सांगण्यात आलेले नाही, पण त्यांना कंपनीकडून देण्यात आलेले फोन्स, लॅपटॉप आणि नवीन खरेदी केलेली उपकरणे स्वत:कडे ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. जेणेकरून करिअरमध्ये बदल करताना त्यांना वर्क फ्रॉम होम करतेवेळी मदत होईल.

त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात लिंक्डइनचा खूप कमी प्रमाणात वापर करण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम कंपनीवर खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या काळात कंपनी नवीन नोकरी देऊ शकत नाही आणि परिणीमी नोकरकपात करावी लागत असल्याचे रॉसलान्सकी यांनी म्हटले आहे.