पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा


नवी दिल्ली – जगभरावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे यावर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवली जाणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान आता बीसीसीआयचा आयपीएल खेळवण्याचा मार्ग टी-20 विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलल्यामुळे मोकळा झाला आहे. बीसीसीआय सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आता बीसीसीआयकडून लवकरच आयपीएलबाबतची अधिकृत घोषणाही करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

आता आयसीसीकडून तीन मोठ्या स्पर्धांचे पुढील तीन वर्षांमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. 2021 व 2022 साली टी-20 विश्वचषक स्पर्धेचेचे तर 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबमध्येच खेळवण्यात येणार आहेत. 2021 साली होणारा टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला, तर 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला आणि 2023 सालामधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचेचा अंतिम सामना 26 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल.

दरम्यान यंदाच्या आयपीएलची घोषणाही आता लवकरच बीसीसीआयकडून करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर बीसीसीआयकडून याबाबत निर्णय घेण्यात येईल. देशातील कोरोना अद्याप नियंत्रणात आला नसल्यामुळे आयपीएल युएईत खेळवण्याची तयारी केली जात आहे.

खेळाडूंची कोरोना चाचणी, क्वारंटाईन कालावधी आणि टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा या सर्व बाबींवर लक्ष देऊन आयपीएलच्या तारखा ठरवल्या जातील. आयपीएल लढतींची प्रक्षेपण करणारी स्टार इंडिया वाहिनीला दिवाळीपर्यंत ही स्पर्धा सुरू ठेवायची होती. पण दिवाळीच्या कालावधीत खेळाडूंना कुटुंबासोबत रहायला मिळावे यासाठी बीसीसीआय दरवर्षी या दरम्यान कोणत्याही लढतींचे आयोजन करत नाही.