कोकणातील जाएंट किलर शिवसेना आमदाराला कोरोनाची लागण


सिंधुदुर्ग -देशासह राज्यावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यातच राज्यातील राजकीय नेत्यांनाही याचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. याच दरम्यान कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले असतानाच स्थानिक आमदाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होत असतानाच सोमवारी रात्री शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक हे जिल्ह्यात सातत्याने दौरे करून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. विशेषतः कुडाळ आणि मालवण या त्यांच्या मतदारसंघाच्या नेहमी दौऱ्यावर होते.

वैभव नाईक हे तेच जाएंट किलर शिवसेना आमदार आहेत, ज्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून दिग्गज नेते नारायण राणे यांचा 10,376 मतांनी पराभव केला होता.