राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार – संजय राऊत


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार असल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेचे राम मंदिर आणि अयोध्या याविषयी वेगळे आणि भावनिक नाते आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेने आपले योगदान, बलिदान दिले असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यापूर्वीही अनेकदा अयोध्येला गेले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 5 ऑगस्ट या दिवशी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

अयोध्या भूमिपूजनाचे निमंत्रण शिवसेनेला आले आहे काय? असे विचारले असता निमंत्रण येईल असे संजय राऊत म्हणाले. राऊत यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोरोना व्हायरस संकटाच्या काळात अयोध्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होईल असे वाटत नाही. पंतप्रधान आणि काही महत्त्वाच्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडू शकेल असेही राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणखी कोण अयोध्येला जाणार का? याबाबत अद्याप काही माहिती नाही. लवकरच तीही माहिती लवकरच पुढे येईल, असेही राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नसल्याचा टोला भाजपला लगावला होता.