
नवी दिल्ली – कोरोनाच्या उगम स्थानानंतर भारतातील लडाखमधील गलवाण क्षेत्रात चिनी लष्कराने केली घुसखोरी या पार्श्वभूमीवर देशात चिनी अॅप्सवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या अॅप्समध्ये तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या टीक-टॉकचा देखील समावेश होता. त्यातच टीक-टॉक बंद झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. अशा परिस्थितीत टीक-टॉककडून देखील हालचाली सुरु झाल्या आहेत. कारण टीक-टॉकला भारतासारखी बाजारपेठ गमावणे परवडणारे नसल्यामुळे आपले चीनमधील मुख्यालय हलवण्याच्या हालचाली टीक-टॉकने सुरू केल्या आहेत. दुसऱ्या देशात मुख्यालय हलवून अॅपवर भारताकडून घालण्यात आलेली बंदी उठवण्यासाठी टीक-टॉक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लंडन आणि कॅलिफोर्निया या दोन पर्यायांवर टीकटॉकने काम करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे.
पुन्हा अॅक्टिव्ह होणार Tik-Tok ? चीनमधून बस्तान गुंडाळण्याची तयारी
यासंदर्भात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार यासंदर्भात लंडन प्रशासन आणि कॅलिफोर्निया प्रशासनासोबत टीक-टॉकची बोलणी सुरू आहेत. टीक-टॉकने हे पाऊल चीनपासून पूर्णपणे संबंध तोडण्यासाठी उचलल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रसाराच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण झाले असल्यामुळे टीक-टॉकची देखील अमेरिकन प्रशासनाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. चीनी सरकारने युजर्सची माहिती देण्यासंदर्भात टीक-टॉकवर दबाव टाकला असू शकतो, अशी शंका अमेरिकेला असल्यामुळे अमेरिकन प्रशासन अधिक सतर्क राहून चौकशी करत आहे. या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियाऐवजी लंडनमध्येच टीक-टॉकचे मुख्यालय होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यालय हलवल्यानंतर देखील भारतासोबतच ज्या ज्या देशांनी टीक-टॉकवर बंदी घातली आहे, त्या देशाकडून काय निर्णय घेतला जातो, यावर सारे काही अवलंबून असणार आहे. शिवाय, टीक-टॉक सुरू झाल्यानंतर देखील जुने युजर्स आणि त्यांच्या अकाऊंटवर असणारे लाखो फॉलोअर्स तसेच राहतील की पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागेल, हे देखील अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
