मंगळावर यान पाठवणारा पहिला मुस्लीम देश ठरला युएई


दुबई – मंगळ मोहिमेचे संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने यशस्वी प्रक्षेपण केले असून ‘होप मार्स मिशन’ अंतर्गत मंगळाचा अभ्यास करण्यासाठी जपानच्या मदतीने युएईने पाठवण्यात आलेल्या यानाचे जपानमधील तानेगाशिमा येथील लाँच पॅडवरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्यामुळेच युएई हा मंगळावर यान सोडणारा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.

हे प्रक्षेपण यशस्वी ठरल्याची माहिती युएईच्या अंतराळ संशोधन संस्थेनेच दिल्याचे आपल्या वृत्तात एएनआयने म्हटले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी यान प्रक्षेपित करण्यात आले. हे यान पुढील सात महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात मंगळाच्या दिशेने प्रवास करेल. त्यानंतर २०२१ मध्ये फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करुन तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करणार आहे. हे यान म्हणजे उमेद आणि मानवतेचे प्रतिक असल्याचे युएईने म्हटले आहे. १.३ टन वजनाचे हे यान ५० कोटी किमीचे अंतर पार करणार आहे.