रावणाने केले होते पहिल्यांदा विमानाचे उड्डाण, श्रीलंकेचा दावा

काही दिवसांपुर्वी नेपाळचे पंतप्रप्रधान केपी शर्मा ओली यांनी दावा केला होता की प्रभू रामाचे मूळ जन्मस्थान हे नेपाळमध्ये आहे. आता आणखी एका देशाने या पौराणिक कथेबद्दल अजब दावा केला आहे. श्रीलंकेच्या सरकारने दावा केला आहे की, 5 हजार वर्षांपुर्वी रावणाने पहिल्यांदा विमानाचा वापर केला होता. श्रीलंकेच्या सरकारने जाहिरात देत रावणाबाबतचे काही कागदपत्रे असल्यास शेअर करण्यास सांगितली आहेत. ही जाहिरात पर्यटन आणि उड्डाण मंत्रालयाने वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये दिली आहे.

जाहिरातीमध्ये म्हटले आहे की, नागरिकांनी रावणासंबंधित कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे अथवा पुस्तके शेअर करावीत. जेणेकरून सरकारला या पौराणिक राजा आणि त्याच्या लुप्त झालेल्या वारसाबाबत संशोधन करण्यास मदत मिळेल. श्रीलंकेच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने आता प्राचीन काळात उड्डाण घेण्यासाठी रावणाने वापरलेल्या पद्धती समजून घेण्यासाठी एक अभियान सुरू केले आहे.

श्रीलंकेचे नागरी उड्डाण प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष शशी दानतुंज म्हणाले की, हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे असंख्य तथ्य आहेत. पुढील 5 वर्षात आम्ही हे सिद्ध करू.

मागील वर्षी नागरी उड्डण विशेषज्ञ, इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ, वैज्ञानिकांनी श्रीलंकेतील कटुनायके येथे एक समेंलन आयोजित केले होते. समेंलनात निष्कर्ष काढण्यात आला होता की रावणाने 5 हजार वर्षांपुर्वी श्रीलंकेवरून आजच्या भारतात उड्डाण घेतले होते व श्रीलंकेत परतला होता. श्रीलंकेत रावणाबाबत लोकांना खास रुची आहे. श्रीलंकेने काही दिवसांपुर्वीच रावण नावाच्या उपग्रहाला अंतराळात पाठवले होते. श्रीलंकेतील अनेक लोक रावणाला एक दयाळू आणि विद्वान राजा समजतात.