मोदींच्या 56 इंच आयडियावर हल्ला करत आहे चीन – राहुल गांधी

भारत-चीन सीमावादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. आता राहुल गांधी यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी चीनबाबत आपले विचार मांडले आहेत. सोबतच चीनच्या विस्तारवादी धोरणाबाबत माहिती दिली आहे. चीन पंतप्रधान मोदींच्या 56 इंचच्या आयडियावर हल्ला करत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले की, हा सर्वसाधारण सीमावाद नाही. माझी चिंता ही आहे की चीन आज आपल्या भागात आहे. चीन रणनीती केल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलत नाही. जगाचा नकाशा त्यांच्या मनात रेखाटला आहे आणि ते स्वत:नुसार त्याला आकार देत आहे. ते जे करत आहे, त्यातच ग्वादार, बेल्ट रोड येते. ही जगाची पुनर्रचना आहे. म्हणून जेव्हा आपण चीनच्या बाबत विचार करतो, तेव्हा आपण ते कोणत्या स्तरावर विचार करीत आहेत हे समजून घेतले पाहिजे.

गांधी म्हणाले की, चीन काही मोठा विचार करत आहे तर ते पाकिस्तानसोबत काश्मिरविषयी विचार करत आहे. त्यामुळे जो वाद आहे तो काही सर्वसाधारण सीमावाद नाही. हा सुनियोजित विवाद आहे, जेणेकरून भारताच्या पंतप्रधानांवर दबाव बनवता येईल. चीन विशिष्ट पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेवर हल्ला करून आपली चाल चालत आहे. चीनला माहित आहे की नरेंद्र मोदींसाठी मजबूत राजनितीज्ञ राहणे मजबूरी आहे. पंतप्रधान मोदींना 56 इंच प्रतिमेचे रक्षण करावे लागेल. हीच खरी आयडिया आहे. त्यामुळे चीन म्हणत आहे की, आम्हाला जे हवे आहे, ते न केल्यास आम्ही नरेंद्र मोदींच्या मजबूत प्रतिमेच्या आयडिला नष्ट करू.