…यालाच म्हणतात खालेल्या मीठाला जागणे


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात अनेक स्थलांतरित मजुरांना त्रास सहन करावा लागला. या काळात अन्न-पाण्याशिवाय आपल्या घरापासून हजारो किलोमीटर दूर रोजगारासाठी आलेले मजूर अडकून पडले. सरकारने या मजुरांना काही काळाने आपल्या घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली. या काळात इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना स्वखर्चाने घरी जाण्याची सोय बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेही केली. सोनूने बस, विमानाची तिकीट काढून देत महाराष्ट्रासह, केरळ, दिल्ली या राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहचवले. सोशल मीडियावर सोनूच्या या कामाचे प्रचंड कौतुक झाले.

लॉकडाउन काळात सोनूने केरळमध्ये काम करणाऱ्या ३२ वर्षीय प्रशांत कुमार प्रधान आणि त्याच्यासोबत १६८ कामगारांना विमानाने ओडीशाला पोहचवले. प्रशांतने आपल्या घरी पोहचल्यानंतर पुन्हा एकदा नवीन सुरुवात करायचे ठरवले. त्यानुसार त्याने आपल्या गावातच एक वेल्डिंग वर्कशॉप सुरु केले. पण वर्कशॉपचे वैशिष्ट्य म्हणजे संकटकाळात धावून आलेल्या सोनूच्या उपकाराची जाण ठेवत प्रशांतने आपल्या वर्कशॉपला सोनू सूद वेल्डिंग वर्कशॉप असे नाव दिले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रशांतने असे सांगितले की, मी कोची विमानतळावर एका कंपनीत प्लंबर म्हणून काम करत होतो. दिवसाला मला ७०० रुपये मिळायचे. माझी नोकरी लॉकडाउन काळात गेली आणि मी साठवलेले सर्व पैसेही संपले. मी श्रमिक एक्सप्रेस गाडीने घरी जाण्याचा प्रयत्न केला, पण मला त्यात यश आले नाही. या काळात सरकारी अधिकाऱ्यांकडूनही काही मदत मिळत नव्हती. आता कुठूनही मदत मिळणार नाही, असे वाटत असतानाच, आमच्यासाठी एखाद्या देवाप्रमाणे सोनू सूद धावून आला. आमच्यासाठी त्याने विशेष विमानाची सोय केली आणि आम्हाला घरी पोहचवले.

घरी पोहचल्यावर भुवनेश्वरपासून १४० किमी अंतरावर राहत असलेल्या प्रशांत कुमारने कामाला सुरुवात केली. यानंतर त्याने सोनू सूदची परवानगी घेत आपल्या दुकानाला त्याचे नाव दिले. प्रशांतशी संपर्क साधत सोनूनेही त्याला शुभेच्छा दिल्या. भविष्यात जेव्हा कधी मी ओडीशाला येईन त्यावेळी तुला जरुर भेटेन असे आश्वासनही सोनूने प्रशांतला दिले आहे.