जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम, काँग्रेसची सरकारवर टीका

राम मंदिराच्या भूमिपूजनाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिर बांधून कोरोनाचे संकट दूर होईल, असे काही मंडळींना वाटत आहे. राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचे संकट दूर व्हावे हीच आमची इच्छा आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. आता या वादात काँग्रेसने देखील उडी घेतली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आले असून, त्यावरून जनतेच लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हाती घेतला असल्याची टीका थोरात यांनी केली आहे.

थोरात म्हणाले की, श्रीराम दैवत आहे, पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तरच रामाचं दर्शन घ्यायला जाऊ. त्यामुळे केंद्र सरकारने आता माणसं जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार, या प्रश्नावर उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, असे थोरात म्हणाले.