स्पॅनिश लीगमध्ये लियोनेल मेस्सीने विक्रमी सातव्यांदा पटकवला ‘गोल्डन बूट’ पुरस्कार

स्पॅनिश लीगच्या अंतिम राउंडमध्ये बार्सिलोनाने अलावेसवर 5-0 ने शानदार विजय मिळवला. या सामन्यात लियोनेल मेस्सीने 2 गोल करत स्पॅनिश लीग ला लीगामध्ये विक्रमी सातव्यांदा एखाद्या सत्रात सर्वाधिक गोल करण्यासाठी गोल्डन बूट मिळवला आहे. मेस्सीने लीगनमध्ये एकूण 25 गोल केले.

मेस्सी लीगमध्ये 7 वेगवेगळ्या सत्रात सर्वाधिक गोल करणारा पहिला खेळाडू आहे. दुखापतीमुळे सत्रातील सुरूवातीच्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता. असे असले तरी त्याने ही कामगिरी केली आहे. अर्जेंटिनाच्या या स्टारने 33 सामन्यात 25 गोल केले.

या आधी मेस्सी टेल्मो जाराच्या बरोबरीत होता. त्याने सलग 4 सत्रात सर्वाधिक गोल करणाऱ्या ह्यूजो सांजेचच्या विक्रमाची देखील बरोबरी केली आहे. मेस्सीने म्हटले की, वैयक्तिक कामगिरी नंतर येते. याच्यासोबतच आम्ही जेतेपद जिंकलो असतो तर अधिक चांगले झाले असते. बार्सिलोना लीगमध्ये रिअल मॅद्रिदनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.