आवडत्या बटर चिकनसाठी पठ्ठ्याचा 32 किमी प्रवास, भरावा लागला 1.23 लाखांचा दंड

जगभरात कोरोना व्हायरसमुळे सर्वकाही ठप्प आहे. विनाकारण बाहेर फिरण्यास परवानगी नाही. मात्र असे असले तरी काहीजण आपल्या आवडत्या गोष्टीसाठी काहीही करू शकतात. असेच काहीसे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे पाहण्यास मिळाले. येथे एका व्यक्तीने आपल्या आवडीचे बटर चिकन खाण्यासाठी तब्बल 32 किमी प्रवास केला. मात्र हे बटर चिकन त्याला चांगलेच महागात पडले.

या पठ्ठ्याने आपल्या आवडत्या बटर चिकनसाठी मेलबर्नच्या सीबीडीपासून 30 किमी अंतरावली वेर्बिए येथे प्रवास सुरू केला. मात्र लॉकडाऊन असल्याने त्याला चांगलाच दंड बसला. व्यक्तीला तब्बल 1652 डॉलर्सचा (जवळपास 1.23 लाख रुपये) दंड भरावा लागला.

स्थानिक पोलिसांनुसार, मागील आठवड्यात 74 लोकांचे चलान फाडण्यात आले. त्यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केले होते. मेलबर्नमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर फिरणाऱ्यांना दंड आकारला जात आहे.