स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात


नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे समस्त देशवासियांच्या नजरा या महामारीचा समूळ नाश करणारी लस कधी उपलब्ध होणार याकडे लागल्या आहेत. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी देशातील भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही कोरोना प्रतिबंधक लस तयार होत असल्याचे जाहीर केले होते. आता या लसीची मानवी चाचणीही सुरु झाली आहे. या लसीची दिल्लीतील एआयआयएसएस ( इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) सोबत मिळून फार्मा कंपनी मानवी चाचणी घेणार असून ही चाचणी दोन टप्प्यात होणार आहे.

या लसीचा पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर प्रयोग केला जाणार आहे. यापैकी १०० जण एआयआयएसएसमधील असतील. १८ ते ५५ वयोगटातील व्यक्तीवर ही चाचणी केली जाणार आहे. या लसीचा पहिला डोस चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा डोस १४ दिवसांनी देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एआयआयएसएस हे COVAXINच्या वैद्यकीय चाचणीसाठी एक ठिकाण आहे.

ही लस हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही विकसित करण्यात आली. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी कोरोनावरील आजारासाठी तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.