पुणेकरांना मोठा दिलासा; २३ जुलैनंतर लॉकडाउन नाही; जिल्हाधिकाऱ्यांची सूचक माहिती


पुणे – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला असून लॉकडाउनचा आज (सोमवार) सातवा दिवस आहे. पण त्यानंतर २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिल्यामुळे पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, पुण्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात होणारी वाढ लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. नागरिकांनी या लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाला चांगले सहकार्य केल्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. पण या पुढील काळात देखील आजपर्यंत सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.

पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजअखेर प्रशासनाकडून रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना राबवण्यात येत आहेत. तर त्याच दरम्यान तपासण्या देखील वाढविण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. रुग्ण संख्या जरी वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुढे येऊन उपचार घ्यावेत. कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडू देणार नाही. तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शहरी भाग आणि त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा अंदाज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.