या महिन्यात देशात दाखल होणार घातक आणि लढाऊ ‘राफेल’


नवी दिल्ली : वाऱ्याप्रमाणे गतिमान असणारे ब्रह्मास्त्र भारताला मिळणार असून फ्रान्सकडून अत्यंत घातक असा मारा करणारे राफेल हे लढाऊ विमान भारताला मिळणार आहे. या आठवड्यात राफेल विमानाची पहिली डिलिव्हरी भारतात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राफेल विमान येत्या २७ जुलैपर्यंत देशात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे आता राफेलच्या भारतात येण्यामुळे शेजारील राष्ट्रांची डोकेदुखी वाढणार असल्याचेही म्हटले जात आहे.

एकीकडे जगभरात कोरोनाचे संकट ओढावले आहे, त्यातच आपल्या शेजारी राष्ट्र हे घुसखोरी आणि दहशतवादाचा पुरस्कार करताना दिसत आहे. त्यातच चीनसोबत भारताचे संबंध मागील काही दिवसांपासून अत्यंत तणावपूर्ण असल्याचे पाहायला मिळत असल्यामुळे भारतात दाखल होणारे राफेल लढाऊ विमान हे चीनच्या सीमारेषेवर तैनात केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, सुरुवातीला केवळ चार विमानांची डिलिव्हरी होणार होती, पण भारताच्या शेजारील राष्ट्रांच्या कारवाया पाहता फ्रान्सकडून आता ६ राफेल विमाने मागविण्यात आली आहेत. दरम्यान, लडाखमध्ये भारतीय सैनिक दिवसरात्र एक करून आपली युद्ध क्षमता वाढवत आहेत, त्यात हे राफेल विमान भारतीय लष्करासाठी ब्रह्मास्त्र ठरणार आहे.