तुम्ही पाहिला का पिवळ्या रंगाचा दुर्मिळ कासव ?

ओडिशाच्या बालेश्वर जिल्ह्यातील सुजानपूर गावातील नागरिकांनी एका पिवळ्या रंगाच्या कासवाला वाचवले आहे. दुर्मिळ प्रजातीच्या या कासवाला नंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. वाईल्डलाईफ वार्डन बी आचार्य म्हणाले की, हा एक दुर्मिळ कासव आहे. याच्या सारखा कासव मी आजपर्यंत पाहिला नाही.

पिवळ्या रंगाचा कासव कदाचितच कोणी बघितला असेल. बालेश्वर जिल्ह्यातील सोरोना ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुजानपूर गावातील वासुदेव महापात्र नावाच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर आढळला. काम करत असताना वासुदेव यांना हा कासव दिसला. यानंतर त्यांनी त्याला पकडले व घरी घेऊन गेले.या दुर्मिळ कासवाला बघण्यासाठी बरीच गर्दी झाली. यानंतर वासुदेव यांनी या कासवाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सोपवले.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी देखील आपल्या ट्विटर अकाउंटवर या दुर्मिळ कासवाचा व्हिडीओ शेअर केला. त्यांनी लिहिले की, कदाचित हा अल्बिनो आहे. काही वर्षांपुर्वी सिंधच्या स्थानिक लोकांनी अशाप्रकारच्या कासवाला वाचवले होते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कासवासारखे आधी असे काहीच पहिले नसल्याचे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.