मांजरेकरांच्या घरी थेट ‘नासा’तून आला वाय-फाय दुरुस्तीसाठी माणूस


संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतासह जगभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या होत्या. याच दरम्यान इंग्लंड-वेस्ट इंडिज या उभय संघात पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवण्यात आला. पण ऑगस्टच्या आधी भारतीय संघ मैदानात उतरणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट केल्यामुळे सध्या सर्वच क्रिकेटपटू आणि त्यांचा सहाय्यक कर्मचारी वर्ग आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. त्याचबरोबर सर्व समालोचकदेखील शक्य तितके घरातूनच काम करत आहेत. याचदरम्यान आपल्या ट्विटर अकाउंटवर भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर याने एक भन्नाट फोटो पोस्ट केला आहे.

कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण जगभरातील जनता सध्या वर्क फ्रॉम होमलाच सर्वाधिक पंसती देत असल्यामुळे घरातील इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. याचदरम्यान वाय-फायचा स्पीड कमी जास्त होण्याची प्रकरणेही दिसून येतात. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने वाय-फाय संबंधीची अशीच एक तक्रार केली. संजय मांजरेकर याला घरात बसून विविध लोकांच्या ऑनलाइन मुलाखती घेण्यासाठी वाय-फायची दुरूस्ती तातडीने गरजेचे असल्यामुळेच त्यांनी वाय-फाय दुरूस्तीसाठी कंपनीच्या कर्मचाऱ्याला बोलावले होते. सध्या करोना संसर्गाचा धोका असल्याने तो कर्मचारी वाय-फाय दुरूस्तीसाठी पीपीइ किट घालून आला होता. संजय मांजरेकरने त्याचा फोटो पोस्ट करत, फोटोला वाय-फाय दुरुस्तीसाठी थेट ‘नासा’तून माणूस आला, असे मजेशीर कॅप्शन दिले. हा फोटो संजय मांजरेकर यांनी ट्विट केला असून या फोटोखाली एकापेक्षा एक झकास प्रतिक्रिया आल्या आहेत.