टर्बोनेटरची खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीतून माघार


नवी दिल्ली – पंजाब सरकारने खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीमधून भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंहचे नाव मागे घेतल्यानंतर अनेकांनी पंजाबर सरकारच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. पण या प्रकरणावर खुद्द हरभजन सिंहने स्पष्टीकरण देत, सरकारला नाव मागे घेण्याची विनंती आपणच केल्याचे सांगितले आहे. कोणत्याही खेळाडूने ३ वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणे हा खेलरत्न पुरस्कारासाठी निकष असतो. याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवर हरभजनने आपले म्हणणे मांडले आहे.

हरभजन सिंह गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात खेळत नाही. त्याचबरोबर हरभजन आयपीएलमध्ये चेन्नईचे प्रतिनिधीत्व करत असला तरीही त्याचे भारतीय संघात पुनरागमन करण्याचे स्वप्न अधुरच आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू अशी ओळख असलेल्या हरभजनने आतापर्यंत १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये हरभजनच्या नावावर अनुक्रमे ४१७ आणि २६९ बळी जमा आहेत.