कंगनाचा आदित्य चोप्रावर हल्लाबोल; ‘सुलतान’ नाकारल्यामुळे मिळाली होती धमकी


यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रावर बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावतने निशाणा साधला आहे. कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य चोप्रावर गंभीर आरोप केले आहेत. मी सलमान खानच्या ‘सुलतान’ या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर मला आदित्यने धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. सलमानच्या ‘सुलतान’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी सर्वात आधी कंगनाला विचारण्यात आले होते. पण चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर तिच्या जागी अनुष्का शर्माची वर्णी लागली.

कंगना ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, सलमान खानच्या सुलतान चित्रपटाची ऑफर मला मिळाली होती. माझ्याकडे चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर आले आणि मला त्यांनी कथा ऐकवली. पण मला कोणत्याच खानसोबत चित्रपट करायचा नव्हता. याबद्दल नंतर आदित्य चोप्रासोबत माझी भेटसुद्धा झाली. मी चित्रपटाला नकार देत या भेटीदरम्यान माफी मागितली होती. ते तेव्हा काहीच बोलले नाही. पण नंतर मी जेव्हा नकार दिल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये झळकली, तेव्हा त्यांचा मला मेसेज आला. मला नकार देण्याची तुझी हिंमत कशी झाली, तुझे करिअर बर्बाद करुन टाकेन, अशी धमकी ते देऊ लागले. मी सर्व गोष्टी माध्यमांसमोर येऊन बोलल्यामुळे त्यांचा पारा चढला होता. तुला कुठेच काम मिळणार नाही. तुझे करिअर आता संपले, असे आदित्य चोप्राने म्हटल्याचे कंगनाने या मुलाखती दरम्यान सांगितले.