भारतापेक्षाही चीनला जोरदार दणका देण्याच्या तयारीत जपान


नवी दिल्ली : संपूर्ण जगावर ओढावलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीला जवाबदार असलेल्या चीनवर जगातील साऱ्याच देशांनी बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. आपले 20 जवान शहीद झाल्यानंतर भारताने चीनचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली होती. पण भारतापेक्षा चीनला जोरदार दणका देण्याच्या तयारीला जपान लागला असून चीनमधील आपल्या कंपन्यांना जपान सरकारने माघारी बोलावले आहे. यासाठी कंपन्यांना येणारा सर्व खर्च जपान सरकारच करणार आहे.

चीनमध्ये जपानच्या 57 कंपन्यांचे प्रकल्प आहेत. जपानने या कंपन्यांना माघारी बोलावले आहे. हे प्रकल्प जपानमध्ये या कंपन्यांनी हलवावेत आणि यासाठी येणारा 53.6 कोटी डॉलरचा खर्च सरकार उचलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अन्य 30 कंपन्या ज्या चीनमध्ये नाहीत परंतू व्हिएतनाम, म्यानमार, थायलंड आणि दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये आहेत त्यांनाही जपानमध्ये स्थलांतर करण्यासाठी सरकारकडून पैसे देण्यात येणार आहेत. निक्केई वृत्तपत्रानुसार यासाठी एकूण 70 अब्ज येन जपान सरकार खर्च करणार आहे. चीनविरोधात उभे ठाकणाऱ्या देशांच्या यादीमध्ये तैवानचे नाव देखील जोडले गेले आहे. तैवानने अशीच योजना 2019मध्ये बनविली होती. कारण चीन दुसऱ्या देशांचा सन्मान करत नाही आणि त्यांच्या सार्वभौमत्वावर काळी नजर ठेवून असतो.

चीनमधून अमेरिकन कंपन्यांना अमेरिका देखील बाहेर काढणार आहे. अॅपलने यासाठी तैवानच्या मोठ्या कंपनीला भारतात स्थलांतर करण्यास सांगितले आहे. चीनमधून अनेक कंपन्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अनेक चिनी कंपन्यांना भारतासह हे देश बॅन करू लागले आहेत. त्यातच अमेरिकेनंतर युरोपमध्येही चीनची टेलिकॉम क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी हुवाईला बॅन करण्यात आले आहे.