बीसीसीआयच्या आणखी एका बड्या अधिकाऱ्याचा राजीनामा


नवी दिल्ली – सीईओ राहुल जोहरी यांच्यानंतर बीसीसीआयच्या आणखी एका मोठ्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिली आहे. भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक आणि बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन्स विभागाचे जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या साबा करीम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अद्याप करीम यांच्या राजीनाम्या मागचे नेमके कारण समजू शकलेले नसले तरीही बीसीसीआयने यापुढील काळात नवीन अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतरच करीम यांची गच्छंती निश्चित मानली जात होती.

करीम यांच्या खांद्यावर भारतीय स्थानिक क्रिकेटचे आयोजन सुरळीत पार पडले जावे याची जबाबदारी होती. करीम यांनी आपल्या पदाचा जानेवारी २०१८ मध्ये कार्यभार स्विकारला. राहुल द्रविडसारख्या अनुभवी खेळाडूकडे बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद देण्यात यावे ही कल्पनाही करीम यांचीच होती. पण बीसीसीआयमधील काही अधिकारी करीम यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यानंतर करीम यांनी आपला राजीनामा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा यांच्याकडे पाठवला आहे.

दरम्यान बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने करीम यांचा राजीनामा मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. करीम पुढील काही काळ नोटीस पिरेडवर काम करतील, त्यादरम्यान बीसीसीआय नवीन जनरल मॅनेजर पदासाठी व्यक्तीची निवड करेल अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.

Loading RSS Feed