ट्विटरवर 6 कोटींच्या पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॉलोअर्स


नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढत असल्याचे दिसत असून 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर नरेंद्र मोदी यांनी अकाउंट उघडले होते. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. त्यातच आता तब्बल 60 मिलिअनच्या पुढे त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या गेली आहे. याचा अर्थ भारतासह संपूर्ण जगात 6 कोटींहून अधिक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर फॉलो करतात. तर मोदी स्वतः 2,354 लोकांना फॉलो करतात.

पंतप्रधान मोदींना ट्विटरवर सप्टेंबर 2019 पर्यंत एकूण 5 कोटी लोक फॉलो करत होते. ते वाढून आता 6 कोटी झाले आहेत. याचा अर्थ त्यांना केवळ 10 महिन्यांतच तब्बल 1 कोटी लोकांनी ट्विटरवर फॉलो केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ट्विटरवर 2 कोटी 16 लाख एवढे फॉलोअर्स आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 1 कोटी पाच लाख लोक ट्विटरवर फॉलो करतात.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये पहिला क्रमांक लागतो. ओबामा यांना तब्बल 12 कोटी लोक ट्विटरवर फॉलो करतात. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा क्रमांक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर 8 कोटी 37 लाख लोक फॉलो करतात.

तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक कोटी 99 लाख लोक फॉलो करतात. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्विटरवर 52 लाख लोक फॉलो करतात. याशिवाय फेब्रुवारी 2019 मध्ये ट्विटरवर अकाउंट सुरू केलेल्या काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा यांना 25 लाख लोक युझर्स फॉलो करतात.