कंगनाच्या बॉलीवूडच्या घराणेशाही विरोधातील भूमिकेचे सिमी गरेवाल यांच्याकडून समर्थन - Majha Paper

कंगनाच्या बॉलीवूडच्या घराणेशाही विरोधातील भूमिकेचे सिमी गरेवाल यांच्याकडून समर्थन


आपल्या बेधडक आणि रोखठोक व्यक्त होण्याच्या शैलीमुळे बॉलीवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगणा राणावत नेहमीच चर्चेत असते. तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील घराणेशाही आणि कंपूशाही विरोधात अक्षरशः रानच पेटवले आहे. त्यातच आता तिच्या या भूमिकेचे ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी देखील समर्थन केले आहे.

याबाबत सिमी गरेवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, कंगनाचा बोल्ड अंदाज मला आवडतो. माझे करिअर देखील अशाच प्रकारे एका ‘पॉवरफुल’ व्यक्तिने उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी मी गप्प बसले, कारण मी कंगणा एवढी साहसी, बहादूर नव्हती. मला हे आठवून भीती वाटत आहे की, सुशांत सिंह राजपूत सोबत काय-काय घडले असेल आणि असे किती आउटसाइडर्स बॉलिवूडमध्ये असतील. ही व्यवस्था बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेत ज्यावेळी जॉर्ज फ्लॉयडची हत्या झाली, त्यावेळी तिथे किती जागृती करण्यात आली. तसेच कदाचित सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये व्हावे, अशी अपेक्षा सिमी गरेवाल यांनी व्यक्त केली आहे.