ट्विटरचेच कर्मचारी हॅकर्सशी मिळाले, हॅकिंगबाबत कंपनीने दिली माहिती

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबाम, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्ससह जगातील अनेक दिग्गजांची ट्विटर अकाउंट्स हॅक करत त्याद्वारे पैसे दुप्पट करण्याचे ट्विट करण्यात आले आहे. ट्विटर लवकरच सर्व ठीक केले जाईल असे सांगत आहे. या बिटकॉईन घोटाळ्यावर आता ट्विटरने स्पष्टीकरण दिले आहे.

ट्विटरने म्हटले आहे की, आम्हाला असे वाटते की हॅकर्सने सोशल इंजिनिअरिंगद्वारे काही ट्विटर कर्मचाऱ्यांना लक्ष केले. त्यांनी ट्विटरच्या अंतर्गत प्रणालीपर्यंत पोहचण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या डेटाचा वापर केला. ट्विटरच्या टू-फॅक्टर सुरक्षा प्रणालीपर्यंत पोहचण्यासाठी देखील त्यांच्या डेटाचा वापर केला.

ट्विटरनुसार, हॅकर्सने 130 ट्विटर अकाउंट हॅक करण्यासाठी कंपनीच्या अंतर्गत सपोर्ट टीमच्या टूल्सचा वापर केला. यातील 45 अकाउंट्सवरून हॅकर्स पासवर्ड रीसेट करणे आणि लॉगिन करण्यासोबतच ट्विट करण्यास देखील सक्षम होते.

दरम्यान, हॅकर्सने बराक ओबामा, जेफ बेझॉस, एलॉन मस्क, बिल गेट्स यांच्यासह अनेक राजकीय नेते, कंपन्या व उद्योजकांचे अकाउंट हॅक केले होते. यांच्या ट्विटद्वारे 1000-2000 डॉलर्स पाठवण्याचे बनावट ट्विट करण्यात आले होते.