गेहलोत धोकेबाज, राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी – मायावती

राजस्थानमध्ये सध्या सत्ता संघर्ष सुरू आहे. यातच अशोक गेहलोत सरकारने एक ऑडिओ टेप जारी केला आहे. या ऑडिओ टेपनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपनंतर आता बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी फोन टॅप करून असंवैधानिक काम केले आहे. राज्यात राष्ट्रपती शासन लागू करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मायावती यांनी काँग्रेसवर निशाणा साधत एकापाठोपाठ दोन ट्विट केले, या ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसला धोकेबाज म्हटले आहे. मायावती यांनी ट्विट केले की, राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले व बीएसपीसोबत दुसऱ्यांदा धोकेबाजी करत पक्षाच्या आमदारांना काँग्रेसमध्ये समावेश केले. आता जगजाहीररित्या फोन टॅप करून त्यांनी आणखी एक बेकायदेशीर आणि असंवेधानिक काम केले आहे.

मायावतींनी पुढे लिहिले की, राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय गतिरोध, परस्पर गोंधळाची परिस्थिती आणि सरकारी अस्थिरतेची परिस्थिती याबाबत प्रभावीपणे लक्ष्य देऊन राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली पाहिजे. जेणेकरून, राज्यात लोकशाहीची आणखी दुर्दशा होणार नाही.

दरम्यान, सरकार पाडण्यासंदर्भातील काँग्रेस आणि भाजप नेत्यांमधील ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यावरून भाजप नेते संबित पात्रा यांनी देखील काँग्रेसवर निशाणा साधला आहे.