राज्यातील सरकार आपणहूनच पडेल – फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक-दीड तास चर्चा झाली. साखर उद्योगाला आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण भेट घेतल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

याशिवाय राज्यातील सरकार पाडण्यात भाजपला कोणताही रस नाही, आम्हाला राज्यात अस्थिरता निर्माण करण्याची इच्छा नाही. ही वेळ करोना व्हायरशी संघर्ष करण्याची आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही. हे सरकार अंतर्गत विरोधानेच पडेल, असेही ते यावेळी म्हणाले.

शरद पवार यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाबाबत फडणवीस म्हणाले की, शरद पवार त्यांचे काम करतात, आम्ही आमचे काम करतोय आणि अशी काही स्पर्धा नाही की त्यांनी काय केले म्हणून आम्ही करायचे. तसेच आम्ही काय केले म्हणून त्यांनी काय करायचे. आम्हाला असे वाटतं की, सध्या साखर उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या पक्षातील साखर उद्योगात असलेल्या नेत्यांनीही याचे गांभीर्य आमच्या लक्षात आणून दिले आहे. केंद्रात आमचे सरकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे आम्ही मागणी घेऊन जाणे, हे अपेक्षितच आहे म्हणून आम्ही आलो आहोत.