अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासाठी आदित्य ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव

देशासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना, विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून देखील गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम असताना, यूजीसीने सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यास सांगितले आहे. आता यावरून युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. युवासेनेने परीक्षा रद्द करण्यात याव्यात, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

युवा सेनेने म्हटले आहे की, केंद्र सरकार परीक्षा घेण्यास परवानगी देताना देशभरातील विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य, चिंता आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहे. कोव्हिड-19 ही राष्ट्रीय संकट आहे. त्यामुळे यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. देश सामना करत असलेल्या संकटाची यूजीला जाणीव नसल्याचे दिसून येत आहे.

युवासेनेने लक्षात आणून दिले की, देशातील मोठ्या शैक्षणिक संस्था जसे की आयआयटीने देखील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या आधी देखील आदित्य ठाकरे यांनी मानव संसाधन मंत्रालयाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावरून टीका केली होती.

दरम्यान, यूजीसीने सांगितले आहे की, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम वर्षाच्या/सेमेस्टर परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातून घेण्यात याव्यात.