देशातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नाडर बनल्या एचसीएलच्या नव्या चेअरपर्सन

भारतातील सर्वात श्रीमंत महिला रोशनी नाडर मल्होत्रा यांनी आपले वडील शिव नाडर यांची जागा घेतली आहे. रोशनी या आता एचसीएल कंपनीच्या चेअरपर्सन म्हणून जबाबदारी सांभाळतील. रोशनी नाडर यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

38 वर्षीय रोशनी यांनी दिल्लीच्या पब्लिक स्कूल वसंत व्हॅलीमधून शिक्षण घेतले. त्यांनी अमेरिकेच्या नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीमधून कम्यूनिकेशनची देखील पदवी घेतली. शिक्षण पुर्ण केल्यानंतर एका चॅनेलमध्ये इंटर्नशिप केली व त्यानंतर लंडनच्या स्काय न्यूजमध्ये काम करू लागल्या. मात्र नंतर वडिलांच्या सांगण्यावरून त्या भारतात परतल्या.

रोशनी यांनी बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये देखील पदव्युत्तर शिक्षण घेतले. एचसीएल ज्वाईन करण्यापुर्वी त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केले. एचसीएलमध्ये ज्वाईन झाल्यानंतर एका वर्षातच त्यांना एचसीएल कॉर्पोरेशनच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ म्हणून नेमण्यात आले. 2009 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी त्या सीईओ झाल्या होत्या.

2010 मध्ये त्यांनी एचसीएल हेल्थ केअरमध्ये वॉइस चेअरमन पदावर कार्यरत शिखर मल्होत्रा यांच्याशी लग्न केले. आता रोशनी यांना दोन मुले आहेत. फॉर्ब्स मॅग्झिनने 2017, 2018 आणि 2019 या तिन्ही वर्षी त्यांना जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताचे देखील शिक्षण घेतलेले आहे.