अमेरिका आणि इंग्लंडचा रशियावर गंभीर आरोप; कोरोना प्रतिबंधक लसीचे संशोधन चोरले


कोरोना प्रतिबंधक सगळ्याच चाचण्यांमध्ये यशस्वी झाल्याचा दावा रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने केल्यानंतर आता रशियावर लसीचे संशोधन चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाकडून करण्यात आला आहे. याबाबत अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले असून रशियावर आरोप केला आहे.

जगभरात कोरोनाचे थैमान सुरु असून त्यावर अद्याप कोणताही लस लस उपलब्ध न झाल्यामुळे रशियाच्या या संशोधनामुळे दिलासा व्यक्त केला जात होता. पण अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाच्या दाव्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याबाबत ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राने केलेल्या आरोपानुसार, लसीसंबंधी संशोधन कऱणाऱ्या ब्रिटनमधील प्रयोगशाळांवर APT29 या हँकिंग ग्रुपने सायबर हल्ले केले आणि महत्त्वाची माहिती चोरली. Cozy Bear या नावानेही APT29 ला ओळखले जाते.

रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचा APT29 ही भाग असून कोरोनावरील लसींची माहिती मिळवण्यासाठी सायबर हल्ले करत आहे. ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राचे (एनसीएससी) संचालक पॉल चेचेस्टर यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी करणाऱ्यांविरूद्ध अशा सायबर हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो.

ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी निवदेनात म्हटले आहे की, कोरोनाशी लढा देण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांना रशियन गुप्तचर यंत्रणांनी अशा पद्धतीने टार्गेट करणे मान्य करण्यासारखे नाही. एकीकडे काहीजण आपल्य स्वार्थी आणि चुकीच्या वर्तनातून आपला स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना इंग्लंड आणि त्यांचे सहकारी देश लस मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचेही ब्रिटनने म्हटले आहे.

Dukes म्हणूनही Cozy Bear यांना ओळखले जाते. अमेरिकेने याआधी हा रशियन सरकारशी संबंधित दोन हॅकिंग ग्रुप असल्याचे सांगितले होते. २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान या हँकिंग ग्रुपने डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी कॉम्प्यूटर नेटवर्कमध्ये घुसखोरी करत ईमेलची चोरी केली होती. दुसऱ्या ग्रुपचे नाव Fancy Bear आहे. पण हे आरोप रशियाने फेटाळले असून आपले त्यांच्याशी काही देणे घेणे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान निवदेनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना संशोधन चोरीची माहिती आहे की नाही याबाबत कोणती माहिती देण्यात आलेली नाही. पण हे संशोधन चोरी करण्यासाठी मोठी रक्कम मोजली असल्याचा ब्रिटीश अधिकाऱ्यांना विश्वास आहे. या चोरीच्या प्रयत्नांवर गुप्तचर संस्थांचे अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत माहिती चोरीला गेली का, हे स्पष्ट झाले नाही. पण, राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राच्या दाव्यानुसार, आतापर्यंत कोणतीही गुप्त माहिती चोरीला गेलेली नाही.

एका महिन्यापूर्वी अमेरिकेनेही असाच आरोप चीनवर केला होता. एपबीआयचे संचालक क्रिस यांनी चीन कोरोनासंबंधी संशोधन करणाऱ्या अमेरिकेच्या आरोग्य संघटना, औषध पुरवठा कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांशी तडजोड करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते.

दरम्यान कोरोना प्रतिबंधक लस रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवली असून स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले होते. ही लस चाचणी परीक्षणात यशस्वी ठरल्याचा दावा विद्यापीठाचा आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला.