शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत


मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत, अशा शब्दांत तोफ डागली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींवर राज्यातील दूध दराचा मुद्दा अधोरेखित करत त्यांच्याकडून कोणतीही भूमिका घेतली जात नसल्याच्या मुद्द्यावरुन तोफ डागली.

राज्यात सध्या दुधाला २२ रुपये इतका दर मिळत आहे. पण, मूलभूत खर्चाची जुळवाजुळव या रकमेतून करत असतानाही शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. लॉकडाऊन होण्याआधी दुधाला प्रतिलीटर साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. पण याबाबत आता मात्र निषेध होताना दिसत नाही. एकेकाळी दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेऊ म्हणाऱ्या राजू शेट्टी यांच्याकडून आता मात्र कोणतीही भूमिका मांडली जात नसल्याचे म्हणत पाटील यांनी शेट्टींवर तोफ डागली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम ही स्वीकारार्ह नसून शेट्टी यांची त्यासाठी भूमिका महत्त्वाची असतानाही त्यात होणारी दिरंगाई पाटील यांना खटकली. त्याचबरोबर राज्यात असणारा युरियाचा तुटवडाही शेतकऱ्यांपुढची मोठी समस्या असल्याची बाब त्यांनी शेट्टींना बोचऱ्या स्वरात लक्षात आणून दिली. शेट्टी यांना मिळणाऱ्या आमदारकीचा उल्लेख करत त्या धर्तीवर आता थेट आमदार झाल्यानंरच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्याल आणि तोपर्यंत गप्प रहाल, असे वाटत असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींना सणसणीत टोला लगावला.

Loading RSS Feed