सप्टेंबरपर्यंत येऊ शकते ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटची कोरोना प्रतिबंधक लस


मागील अनेक महिन्यांपासून पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ मिळून बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची बरीच चर्चा सुरु आहे. संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधात लस ऑक्सफर्डने विकसित केली असून या लसीचे उत्पादन सिरमकडून केले जाणार असल्यामुळे यशस्वी ठरलेल्या अन्य लसींच्या तुलनेत ही लस भारतीयांना लवकर मिळू शकते.

दरम्यान ही कोरोना प्रतिबंधक लस मानवी चाचणीमध्ये कितपत परिणामकारक ठरली, ते आता समोर आले असून ही लस ऑक्सफर्डच्या संशोधकांच्या अपेक्षेप्रमाणे मानवी शरीरावर परिणामकारक ठरली आहे. ही लस टोचल्यानंतर धोकादायक कोरोना व्हायरपासून दुहेरी संरक्षण मिळू शकते असे संशोधनातून समोर आले आहे. ही लस म्हणजे कोरोना विरोधात महत्त्वाचा शोध असल्याचे संशोधक मानत आहेत.

हे वृत्त पीटीआयने यूकेमधील प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिले आहे. लसीचा डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या शरीरात अँटीबॉडीजसोबतच किलर ‘टी-सेल्स’ची निर्मिती झाल्याचे दिसून आले. हे वृत्त या संशोधनात सहभागी असलेल्या सूत्राच्या हवाल्याने ‘द डेली टेलिग्राफ’ने दिले आहे. संशोधकांच्या दृष्टीने टी-सेल्सची शरीरात निर्मिती होणे, खूप महत्त्वाचा शोध आहे. कारण काही महिन्यात अँटी बॉडीज निघून जातात पण टी-सेल्स शरीरात वर्षानुवर्ष राहतात.

चाचणीतून समोर आलेल्या गोष्टी खूपच आशादायक आहेत. पण संशोधक सावध आहेत, कारण ऑक्सफर्डची लस दीर्घकाळासाठी व्हायरसपासून संरक्षण देईल, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. ऑक्सफर्डची लस घेतल्यानंतर शरीरात अँटी बॉडीज आणि टी सेल्सची निर्मिती होते. हे कॉम्बिनेशन लोकांना सुरक्षित ठेवेल अशी अपेक्षा आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण अजूनही आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

येत्या सोमवारी ‘द लॅन्सेट’ मेडीकल जर्नलमध्ये ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचा सुरुवातीच्या टप्प्यातील मानवी चाचणीचा डाटा प्रसिद्ध होणार आहे. लस विकसित करणारी टीम योग्य मार्गावर असल्याचे ऑक्सफर्डच्या चाचण्यांना परवानगी देणारे बर्कशायर रिसर्च एथिक्स कमिटीचे अध्यक्ष डेव्हीड कारपेंटर यांनी सांगितले.


पण याची अंतिम तारीख कोणीही सांगू शकत नाही. काही गोष्टी चुकू सुद्धा शकतात. पण मोठया फार्माकंपनी सोबत काम करत असताना लस सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. हेच आमचे लक्ष्य असून त्या दिशेने आम्ही काम करत असल्याचे डेव्हीड कारपेंटर म्हणाले. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इंस्‍टीट्यूटने विकसित केली आहे. यूके सरकारने त्यांना मदत केली असून अस्त्राझेनेका उत्पादनाची जबाबदारी संभाळणार आहे. ऑक्सफर्डच्या लसीची आता फेज ३ ची चाचणी सुरु आहे. यामध्ये हजारो स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे.