‘ही’ कंपनी आता भारतातच करणार स्मार्टफोनची निर्मिती


नवी दिल्ली – भारतातच मोबाईल फोन विकसित करण्यासाठी इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने घेतला आहे. त्याचबरोबर कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या वाढवून ५० हजार करण्याचा निर्णय देखील कंपनीने घेतला आहे. यासाठी भारतात ७ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. कंपनीची मोबाईल उत्पादन क्षमता याद्वारे सध्याच्या ३.३ कोटी युनिट्सवरून १२ कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती विवो इंडियाचे संचालक (ब्रँड स्ट्रॅटेजी) निपुण मारया यांनी दिली.

इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापनाही विवो भारतात करणार आहे. त्यानंतर ना केवळ मेक इन इंडियाच उत्पादनांची निर्मिती होईल तर मोबाईलचे डिझाईनदेखील भारतातच तयार केले जाईल, अशी माहिती निपुण मारया यांनी दिल्याचे वृत्त पीटीआयच्या हवाल्याने फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिले आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजेवर सध्या हे डिझाईन सेंटर लक्ष देणार आहे. त्याचबरोबर भारतातच डिझाईन केलेला आणि भारतातच निर्मिती केलेला विवोचा पहिला फोन २०२०-२१ च्या दरम्यानच लाँच होणार आहे. मारया यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमात ५जी साठी तयार केलेल्या X50 सीरिजचा स्मार्टफोन लाँच करत प्रिमिअम सेगमेंटमध्ये पाऊल टाकले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉरल लोकल या अभियानालाही आपले समर्थन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आपल्या ग्रेटर नोयडा येथील प्रकल्पाच्या विस्तारासाठी कंपनीने ७ हजार ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचीही घोषणा केली. भारतीय बाजारपेठेत विवोचा तब्बल २१ टक्के हिस्सा आहे आणि ती दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनीही ठरली आहे. आपल्या प्रकल्पाचा विस्तार कंपनी करणार आहे. विस्तारासोबतच कर्मचाऱ्यांची संख्यादेखील ५० हजारांवर नेली जाणार आहे. या गुंतवणुकीनंतर हा प्रकल्प विवोच्या सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक ठरणार असल्याचेही मारया म्हणाले.

Loading RSS Feed